झुंडबळी प्रकरणात दहा लाखांची भरपाई
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपुण्यातील झुंडबळी प्रकरणात (मॉब लिंचिंग) मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून २ जून २०१४ रोजी दंगल उसळली होती. त्यावेळी आयटी कंपनीत काम करणाऱ्या २४ वर्षीय मोहसीन शेख या तरुणाची जमावाने हत्या केली होती. मोहसीनचे वडील सादिक शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 'जातीय हिंसाचारातील बळींच्या कुटुंबाला नुकसानभरपाई दिली जाते. त्यानुसार, केंद्र व राज्य सरकारकडून मिळून दहा लाख रुपयांची भरपाई मिळायला हवी होती. मात्र, ती मिळाली नाही', असे सादिक यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारकडे उत्तर मागितले होते. त्यानुसार, गुरुवारच्या सुनावणीत अतिरिक्त सरकारी वकील मनीष पाबळे यांनी याचिकादारांना आठवड्याभरात भरपाईची रक्कम दिली जाईल, अशी माहिती न्यायालयात दिली.या हत्या प्रकरणात पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेना या हिंदुत्ववादी संघटनेच्या अनेकांना पूर्वी अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाअंती संघटनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह २३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले असून न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2FSoc5H
from Maharashtra Times https://ift.tt/2FSoc5H
Post a Comment