दिव्यांग दिनाच्या निमित्ताने अनोखी काव्यानुभूती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईकविता हा नुसता वाचण्याचा नाही तर अनुभवण्याचा साहित्यप्रकार आहे. एखादी कविता वाचताना मनामध्ये संबंधित प्रतिमा उभ्या राहतात. मात्र, या प्रतिमांना वास्तवातील दृश्याचा आधार असतो. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवारी ३ डिसेंबर रोजी मॅक्स मुलर भवन आणि स्पर्शज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्पर्शांकित- पोएट्री इन ब्रेल' हा साहित्य वाचनाचा एक अनोखा आविष्कार रसिकांना पाहायला मिळणार आहे. नीरजा, गणेश कनाटे, रवींद्र लाखे, प्रिया जामकर आणि संतोष पद्माकर या कवी-कवयित्रींच्या कविता एकाच सभागृहात ब्रेललिपीद्वारे काही प्रज्ञाचक्षू व्यक्ती सादर करणार आहेत. त्यानंतर हे कलाकार स्वतः आपल्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. या दोन्ही आस्वाद प्रक्रियेत नेमका काय फरक पडतो, आशय अनुभूती काय असते, स्पर्शज्ञानाने सुरू झालेली कविता वाचकाला नेमक्या कोणत्या पातळीवर त्यातील अर्थाचा अनुभव देते, अशी काही उत्तरे या निमित्ताने रसिकांसमोर येणार आहेत. हा कार्यक्रम सोमवारी मॅक्स मुलर भवनच्या ग्रंथालयात सायं. ६ वाजता होणार असून, यासाठी प्रवेश मोफत आहे. रूपाली शेलार, परिमल भट, हर्षद जाधव आणि प्रकाश पंडागळे हे प्रज्ञाचक्षू तरुण ब्रेलमध्ये लिहिलेल्या कविता वाचून दाखवतील. हे सादरकर्ते आधी ब्रेलमधील दोन कविता सादर करतील. त्यानंतर प्रत्येकी तीन कविता कवी-कवयित्री स्वतःच सादर करणार आहेत. यामध्ये एक समांतर सौंदर्यशास्त्र उलगडते का हेसुद्धा समजेल, अशी भावना या कार्यक्रमाच्या आयोजक आणि मॅक्स मुलर भवनच्या अधिकारी जयश्री जोशी यांनी व्यक्त केली. या कविता वाचनानंतर प्रज्ञाचक्षू व्यक्तींशी संवाद साधण्यात येईल. यामध्ये त्यांच्या मनात कवितेचे रूप कसे उभे राहिले हे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. 'ब्रेललिपी सामान्य व्यक्तींना वाचता येत नाही. त्यामुळे ब्रेलमधील साहित्य समोर येते तेव्हा सामान्य व्यक्ती ते वाचण्यासाठी सक्षम नसतात. तर, प्रज्ञाचक्षू व्यक्तींपर्यंत इतर पुस्तकांमधील कविता वाचून दाखवल्याशिवाय पोहोचत नाहीत. त्यामुळे अपंग दिनानिमित्त एकाचवेळी ब्रेलमधील आणि सामान्य कवितावाचनाचा अनुभव देण्याचा निर्णय घेतला', असे जोशी म्हणाल्या. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2FW4RAG

No comments

Powered by Blogger.