मराठा आरक्षणाला आव्हान, सोमवारी याचिका?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे विधेयक राज्य सरकारने विधिमंडळात मंजूर करून घेतले असले तरी आरक्षणविरोधकांनी याप्रश्नी कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या विधेयकाला राज्यपालांनी शुक्रवारी मंजुरी दिल्याने त्याला सोमवारीच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे.'सर्वोच्च न्यायालयाने १९९२मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार एकूण ५० टक्क्यांपुढे आरक्षण देण्यावर निर्बंध आहेत. त्याचे उल्लंघन करून राजस्थानमध्ये गेल्या वर्षी राज्य सरकारने विशिष्ट समाजाला आरक्षण दिले असता त्याला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. राजस्थान उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयांचे निवाडे लक्षात घेऊन राज्य सरकारच्या आरक्षण कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले असता, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने १३ नोव्हेंबर २०१७ रोजी अंतरिम आदेश देताना राज्य सरकारला ५० टक्क्यांच्या मर्यादेपुढे कोणत्याही समाजाला आरक्षणाचे लाभ देण्यास स्पष्ट मनाई केली. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन ५० टक्के मर्यादेच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाकरिता १६ टक्के आरक्षण देण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाला मंजुरी देऊ नये आणि त्याला स्थगिती द्यावी', अशी विनंती करणारे पत्र 'इंडियन कॉन्स्टुट्युशनलिस्ट कौन्सिल'च्या सदस्य डॉ. जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत शुक्रवारी तातडीने राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना पाठवले होते. मात्र, राज्यपालांनी संध्याकाळी या विधेयकावर स्वाक्षरी करून त्याला मंजुरी दिल्याने मराठा आरक्षणाला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता या कायद्याला सोमवारी, ३ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात याचिका करून आव्हान देणार असल्याचे अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी 'म.टा.'ला सांगितले.आरक्षणसमर्थकांचे कॅव्हेटआरक्षणासाठी राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल लवकर येण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करणारे मराठा आरक्षणसमर्थक विनोद पाटील यांनी शुक्रवारी 'कॅव्हेट' अर्ज दाखल केला. नियोजित आरक्षण कायद्याच्या विरोधात कोणीही याचिका केल्यास आमची बाजू ऐकल्याविना अंतरिम आदेश देऊ नये, अशी विनंती पाटील यांनी या अर्जाद्वारे उच्च न्यायालयाला केली आहे.'मुस्लिम समाजावर अन्याय''यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा वटहुकूम काढतानाच मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षण देणारा वटहुकूम जारी केला होता. बापट आयोगाने मराठा समाज मागास नसल्याचे म्हणतानाच मुस्लिम समुदायातील काही वर्ग मागास असल्याचे म्हटले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देतानाच मुस्लिम समाजाला सरकारी व अनुदानित शिक्षण संस्थांमधील प्रवेशात पाच टक्के आरक्षण देण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानुसार, मुस्लिमांच्या आरक्षणाविषयी राज्य सरकारने सहा महिन्यांच्या आत वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर करणे आवश्यक होते. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप-शिवसेना युती सरकारने मुस्लिम समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि केवळ मराठा समाजाच्या हिताचा विचार केला. राज्य सरकारची ही कृती भेदभावपूर्ण असल्याने आम्ही यासंदर्भात दाद मागणार आहोत', असे ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांनी 'म.टा.'ला सांगितले. या मुद्यासंदर्भात अॅड. तळेकर यांनी 'जमात उलेमा-ए-हिंद' या याचिकादार संस्थेतर्फे उच्च न्यायालयाचे न्या. अमजद सय्यद यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला विनंती केल्यानंतर खंडपीठाने त्यांच्या याचिकेवर ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2zAZBga
from Maharashtra Times https://ift.tt/2zAZBga
Post a Comment