छेडछाडीचा जाब विचारला; पोलिसाला मारहाण

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याचा राग मनात धरून सहा जणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच केईएम रुग्णालयासमोर घडली. या उपनिरीक्षकाला टॅक्सीतून अपहरण नेत असताना गस्तीवरील पोलिसाची नजर पडली आणि त्याची सुटका करण्यात आली. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा भाऊ आजारी असल्याने त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भावाला बघण्यासाठी हा उपनिरीक्षक पत्नीसह २४ नोव्हेंबर रोजी केईएम रुग्णालयात गेला. पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी दोघेही केईएम रुग्णालयासमोरील दुकानात जात असताना येथे उभ्या असलेल्या फेरीवाल्यांनी उपनिरीक्षकाच्या पत्नीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. पहिल्यांदा दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. पण फेरीवाल्यांची शेरेबाजी सुरूच होती. याबाबत उपनिरीक्षकाने यातील एका तरुणाला हटकले. यामुळे या तरुणासोबत असलेले इतर पाचही तरुण संतापले. त्यांनी उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही, तर त्यांनी जवळच्याच टॅक्सीमध्ये या उपनिरीक्षकाला कोंबले. टॅक्सीतून मारहाण करीत नेत असताना उपनिरीक्षकाने मदतीसाठी आरडाओरडा केला. पादचाऱ्यांनी हे ऐकून जवळून जाणाऱ्या पोलिसाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलिस मागावर असल्याचे कळताच चालकाने टॅक्सी थांबवली. उपनिरीक्षकाने संधी मिळताच या तरुणांच्या तावडीतून सुटका करून घेतली. पोलिस उपनिरीक्षक आणि पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चौघे अद्याप फरार आहेत. ही सर्व घटना येथील सीसीटीव्हींमध्ये कैद झाली आहे. पोलिस ठाण्यात वाईट वागणूक पोलिस उपनिरीक्षक आणि त्याची पत्नी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले. आपण पोलिस असल्याचे सांगूनही ड्युटीवर असलेल्या पोलिस निरीक्षकाने तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. उलटसुलट प्रश्न विचारात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करू लागला. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दखल घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zAQ8VY

No comments

Powered by Blogger.