....म्हणून दिल्लीच्या धडक मोर्च्याला आलो

नवी दिल्ली: देशभरातील हजारो शेतकऱ्यांच्या मोर्च्याने आज संसद मार्गावर धडक दिली. यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी शेतकरी देखील सहभागी झाले होते. दुष्काळामुळे होणारे नुकसान आणि कर्जमाफीच्या नावाखाली दिशाभूल झाल्यामुळे दिल्लीतील या मोर्च्यात आम्ही सहभागी झालो अशा भावना असंख्य शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील पुणे, पालघर, कोल्हापूर, औरंगाबाद, बुलढाणा ई. जिल्ह्यांतून हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चाला हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांचे यावेळी दुष्काळामुळे प्रचंड नुकसान झाले. 'यावर्षी एकच महिना पाऊस पडला त्यानंतर पाऊस पडलाच नाही. दुष्काळामुळे आमची पिकं जळून गेली. पिकांची नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन सरकारने दिले. मुंबईत आंदोलनाच्या वेळी तसे लिहूनही दिले पण वास्तवात हातात एक रुपयाही पडला नाही' अशी भावना लक्ष्मण मावळ या शेतकऱ्याने व्यक्त केली. तर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अजूनही सरसकट कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असल्यामुळे आम्ही या मोर्च्यात सहभागी झालो आहे असं सांगितलं, ' वाडा तालुक्यातून इथे आलेल्या अनेक शेतकऱ्यांवर ३ लाख-४ लाख रुपयाचे कर्ज आहे. सरसकट कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया केली . एक वर्षं झालं तरी कर्जमाफीचा अजून पत्ता नाही. वनहक्क कायद्याअंतर्गत मिळणारी रक्कमही अजून मिळालेली नाही. यामुळेच आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोच अशी खंत वाडा तालुक्यातून आलेल्या राजेश कांकरा यांनी व्यक्त केली. तर सुपीक समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर , सातारा, सांगली या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते. उसाला साडेनऊ टक्के एफआरपी मिळावा या मागणीसाठी आणि सरकारला जागं करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत असं मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. ' उस निर्मितीचा आणि दळणवळणाचा दर प्रचंड वाढला आहे. त्यात सरकार १० टक्के एफआरपी लावून शेतकऱ्यांचं अधिक नुकसान करते आहे. ऊसाची शेतकरी तोट्याची होत चालली आहे. तेव्हा सरकारला जागं करणं गरजेचं आहे.' अशी भावना इचलकरंजीहून आलेल्या निवृत्ती शिरगुरे यांनी व्यक्त केली आहे. एकंदर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आमची फसवणूक केली आहे अशी भावना रावसाहेब देसाई यांनी व्यक्त केली. जनआंदोलनाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही असा सूरही शेतकऱ्यांच्या बोलण्यातून उमटत होता. बहुतांश शेतकरी गावापासून दिल्लीपर्यंत कोणत्याही मदतीशिवाय स्वखर्चाने आले होते. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांनी आतातरी सरकार जागं होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2KHJWjz

No comments

Powered by Blogger.