...म्हणून मी फेटा बांधला नाही!: अजित पवार
मुंबई:मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. 'आरक्षणाच्या निर्णयात प्रत्येकाचा वाटा आहे. त्यामुळं कुणी एकानं त्याचं श्रेय घेणं चुकीचं आहे. श्रेय घेण्याआधी सरकारनं आरक्षणाची अंमलबजावणी करावी, असं सांगतानाच, 'मलाही जल्लोषाचा फेटा बांधता आला असता. पण आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या ४० तरुणांचं बलिदान माझ्या डोळ्यांपुढं आहे,' असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर अजित पवार यांनी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची व धरपकड थांबवण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा जल्लोष करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना फटकारले. 'कुठल्या गोष्टीचा जल्लोष करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. हे आरक्षण सहजासहजी मिळालेलं नाही. अनेकांनी त्यासाठी कष्ट उपसलेत. बलिदान दिलंय. अनेकांच्या घरी यंदा दिवाळी साजरी झाली नाही. त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करणं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणून मी जल्लोषाचा फेटा बांधला नाही,' असं पवार म्हणाले. 'मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहेच, पण १०० टक्के नाही. कारण, हे आरक्षण मिळवण्यासाठी बरंच काही गमवावं लागलंय,' असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाचं श्रेय सर्वांचं आहे. समाजातील सर्व घटकांनी त्याला पाठिंबा दिला होता,' असं पवार म्हणाले. आदित्य ठाकरेही विधान भवनातएरवी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपनं मराठा आरक्षणाचा जल्लोष खांद्याला खांदा लावून केला. शिवसेना-भाजपचे आमदार भगवे फेटे बांधून विधानभवनात दिसत होते. त्यांनी एकमेकाला पेढे भरवून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे स्वत: विधान भवनात आले होते. आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rdCHqB
from Maharashtra Times https://ift.tt/2rdCHqB
Post a Comment